| रसायनी | प्रतिनिधी |
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे पर्व सुरू झाले असून, त्यासाठी 17 विभागाच्या 25 योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कर्मयोगी योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत कलोते चौक येथे करण्यात आला. तसेच, यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच, दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू असणाऱ्या पंधरवडा सेवा पंधरवडा अभियानाला ‘सेवा पर्व’ तसेच ‘आदी सेवा अभियान’ म्हणून संबोधले जाणार आहे. खालापूर तालुक्यातील 10 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी जावळे पुढे म्हणाले की, ‘अपना गाव समृद्धी का सपना’ या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी गावाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. त्यासाठी निवडलेल्या गावामध्ये व्हिलेज ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाच्या गरजा ओळखून विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी गावातील बुद्धिजीवी व सक्षम माणसांची निवड करावी, असे आवाहन जावळे यांनी केले. प्रास्ताविकात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी सांगितले की, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आदिवासींपर्यंत पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. महिला व बाल कल्याण, ग्रामीण विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या 17 विभागाच्या 25 योजना समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासह निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, विनोद चांदोरकर, महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप, प्रशासक अमित म्हसकर, ग्रामपंचायत अधिकारी निलेश म्हसकर, महिला व बालविकास अधिकारी अंधोरीकर, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.







