विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध

चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन
पीएनपी महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

विद्यार्थ्यांना प्रगत आणि उच्च शिक्षण मिळावे, यासाठी पीएनपीच्या माध्यमातून विविध अद्ययावत संकल्पना साकारण्यात आल्या आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात येथील विद्यार्थी मागे राहू नये यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम प्रयत्न केले जात आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले. पीएनपी शाळेत बुधवारी (दि.22) अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.



यावेळी आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, आरसीएफचे महाव्यवस्थापक शशिकांत उखळकर, सोजे, कुरुळ ग्रामपंचायतीचे सदस्य अवधुत पाटील, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, अ‍ॅड.प्रसाद पाटील, सुजाता पाटील, डॉ. प्रणाली पाटील, दिग्दर्शक राजन पांचाळ, प्रसाद लोध यांच्यासह पीएनपी महाविद्यालयाचे संचालक प्रा. विक्रांत वार्डे, प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्रा. रवींद्र पाटील, इतर प्राध्यापक, संकुलातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळांचे नूतनीकरण व उद्घाटन समारंभ पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते तसेच आरसीएफच्या सहकार्यातून पार पडला. यावेळी आरसीएफचे पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्व्लन करण्यात आले. विज्ञान या क्षेत्रातील वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अजैविक/ऑर्गेनिक व भौतिक विश्‍लेषणात्मक तसेच एमएस-सीआयटी/ आधार केंद्र या प्रयोगशाळांचे पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील तसेच आरसीएफ मुख्य पदाधिकारी व पीएनपी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व सर्व सहकार्‍यांकडून पाहणी करण्यात आली. पीएनपी महाविद्यालयात शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांची यावेळी आरसीएफच्या पदाधिकार्‍यांना ओळख करून देण्यात अली.

एमएस-सीआयटी/आधार केंद्राचा विद्यार्थ्यांना फायदा
आम्ही फक्त शिक्षणच देत नाही, तर मुलांना नोकरीसाठी मार्गदर्शन व संधी पण देतो, हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी पीएनपी महाविद्यालया एमएस-सीआयटी/आधार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जेणेकरून विद्यार्थ्यांना या सुविधांसाठी बाहेर जावे लागू नये, असे प्राध्यापकांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version