। पोलादपूर । प्रतिनिधी ।
जगभरात 5 जून रोजीचा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होत असतानाच पोलादपूर तालुक्यात मात्र तो प्रदूषण दिन ठरला आहे. रायगडावर राज्याभिषेक दिनाच्या नियोजनबद्ध वर्धापनदिनासाठी तालुक्यातील प्रशासन तत्परतेने रवाना झाले होते. त्याचवेळी प्रदूषणकारी असामाजिक तत्वांनी तालुक्यात कापडे बुद्रुक व वाकण खांबेश्वरवाडी दरम्यान रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याचे आणि आंबेनळी घाटातील कुंभळवणे फाट्याजवळ रासायनिक घनकचर्याची पोती उघड्यावरच टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
पोलादपूरच्या निसर्गरम्य वातावरणाला रसायनांची बाधा आणण्याचे काम ज्या समाजकंटकांनी केले आहे; त्यांनी जागतिक पर्यावरणदिनाचा मुहूर्त साधूनच प्रदूषण करायला सुरूवात केली आहे. शिवराजधानी रायगडावर राज्याभिषेक दिनाच्या नियोजनबध्द वर्धापनदिनासाठी पोलादपूर तालुक्यातील पोलीस, महसूल, आरोग्य व पंचायत समितीतील प्रशासन तत्परतेने रवाना झाले होते. त्यामुळे पर्यावरण दिनाला प्रदूषण दिनामध्ये बदलणार्या या केमिकल वेस्ट डिस्ट्रॉयर्सना शोधून कडक कारवाई करण्याचे आता पोलादपूर पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. तसेच, प्रशासनानेही नागरिकांच्या जिविताशी खेळणार्या या प्रदूषणकारी समाजकंटकांविरूध्द कडक कारवाईचे हत्यार उपसण्याची गरज आहे, असे स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींमधून बोलले जात आहे.
चार वर्षांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटालगत रासायनिक सांडपाणी टाकण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना आता प्रदूषणकारी असमाजिक तत्वांनी वाकण खांबेश्वरवाडीतील नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडल्याचे उघडकीस आले आहे. यावेळी वाकण ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच जंगम यांनी दूषित पाण्याचे नमूने तपासण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडीकडे सोपविले आहेत. या पाण्याच्या नमून्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच, पोलादपूर-वाई-सुरूर रस्त्यावरील आंबेनळी घाटाच्या कुंभळवणे फाट्याजवळ संरक्षक कठड्यालगत दरीच्या बाजूला सुमारे हजारो टन रासायनिक घनकचर्याची पोती उघडयावरच टाकण्यात आली आहेत. त्यामध्ये रिऍक्टरमधील ऍश म्हणजेच राख असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता महाड औद्योगिक वसाहतीमध्ये वायू आणि जलप्रदूषण करणार्या कंपन्यांनी पोलादपूर तालुक्याचा निसर्गरम्य आणि स्वच्छ नदीपात्रांना लक्ष्य बनविल्याची चर्चा स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे. चार वर्षांपूर्वी हे प्रदूषणकर्ते कशेडी घाटामध्ये दरीतील उतारावर रासायनिक टँकर रिकामे करून पळ काढताना ढाब्यांवर पोलीस संरक्षणात सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे उघडकीस आले होते.