लोखंडी रेलिंगही तुटल्याने अपघाताची शक्यता
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी (दि. 7) पहाटे संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. खोल दरीच्या काठावर असलेली भिंत कोसळून रेलिंगसुद्धा निखळलेली आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटे अचानक संरक्षक भिंत कोसळली. यामुळे त्या ठिकाणी रस्ता खचून घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील लोखंडी रेलिंगही तुटले आहेत. प्रशासनाकडून घटनास्थळी सध्या फक्त दगड लावून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या घाटातून वाहतूक सुरळीत सुरू आहे. परंतु, या उपाययोजना अपुऱ्या असून कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर तातडीने कायमस्वरूपी बांधकाम आणि लोखंडी रेलिंग बसविण्याची आवश्यकता आहे.