शासकिय अधिकार्‍यांची अक्कल चव्हाट्यावर; चुकीच्या ठिकाणी लावले पर्जन्यमापक

शेतकर्‍यांच्या नियोजनावर फिरतेय पाणी

। म्हसळा । वार्ताहर ।

आसमंतातील घरे व झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणार्‍या जोराच्या वार्‍यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यमापक कधीही उतार असलेल्या जमिनीवर, भिंतीलगत, इमारतींच्या गच्चीवर, भिंतीवर किंवा छपरावर बसवू नये, अशा स्पष्ट तांत्रिक सूचना असूनही म्हसळा तालुक्याचे मुख्य पर्जन्यमापन केंद्र सदोष व तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी आहे.

म्हसळा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान किमान 3300 ते 3500 मि.मी. व कमाल 4500 मि.मी. असल्याचे कृषी व महसूल विभागाच्या तालुक्यातील नोंदणीत आहे. मागील सहा वर्षांच्या नोंदी पाहता तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 4344 मि.मी. आहे. तालुक्यात मंडलनिहाय म्हसळा व खामगाव या दोन ठिकाणी महसूल विभागाची पर्जन्यमापक यंत्रे आहेत. दि. 3 सप्टेंबर रोजी महसुली नोंदीनुसार, म्हसळा 2622 मि.मी., खामगाव 1568 मि.मी. पावसाच्या नोंदी आहेत. ही तफावतसुद्धा जास्त आहे, असा जाणकारांचा अंदाज आहे. शासकीय नोंदीप्रमाणे सुमारे, 1054 मि.मी. पाऊस म्हसळ्याला जास्त पडला. म्हसळा व खामगाव मंडळ भौगोलिक तुलना करता व जाणकारांच्या अंदाजानुसार, म्हसळ्यापेक्षा खामगाव परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते.

महसूल विभाग अनभिज्ञ
जिल्हा नियोजन व विकास परिषदेकडून नाविन्यपूर्ण बाब म्हणून मंडलनिहाय पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय सन 2013 साली झाला. त्यामध्ये म्हसळा तालुक्यातील खामगाव मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कृषी चिकित्सालय देहेन येथे व म्हसळा मंडळातील पर्जन्यमापक यंत्र मराठी शाळा येथे बसविल्याची माहिती जिल्हाधिकारी रायगड व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे आहे. परंतु, या दोनही ठिकाणच्या नोंदी महसूल विभागाकडे उपलब्ध नसल्याची अजब माहिती समोर येते.

Exit mobile version