स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

| पाली/बेणसे | वार्ताहर |

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शेठ ज.नौ. पालीवाला वाणिज्य महाविद्यालय आणि विज्ञान व कला महाविद्यालय पाली सुधागड येथे वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ पनवेल, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने कौशल्य शिक्षण जागरूकता आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते तथा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल जोशी यांनी आगामी काळात विद्यार्थ्यांना व्यवसाय व नोकरी संदर्भात असणारी संधी, औदयोगिक क्षेत्रातील, माहिती तंत्रज्ञान, मानव संसाधन, वित्तीय, विपणन व इतर क्षेत्रातील असणाऱ्या विविध संधी या संदर्भात उपयुक्त माहिती दिली. तसेच सदरहू कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एम. बी. ए. या शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया व अभ्यासक्रमाची अद्यावत माहिती देऊन एम. बी. ए. प्रवेश घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच या कार्यशाळेचे अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर लहुपंचाग यांनी नविन शैक्षणिक धोरण 2020 चे महत्व सांगून कौशल्य विकास आधारित शिक्षणाचे महत्व उपस्थित महाविद्यालययीन विद्यार्थ्यांना समजावले.

तसेच, कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (पनवेल) महाराष्ट्र शासन रायगड प्रतिनिधी सौरभ शुभेदार यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याला जोपासून त्याला विकसित करण्यासाठी वाव दिला पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकारचे कौशल्याआधारित विद्यापीठ स्थापन करण्याचे नियोजन ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरणाद्वारे अतिशय उत्तम प्रकारे दाखविले.

Exit mobile version