| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत जामा मस्जीद विश्वस्त ट्रस्टचे निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या मिटींगमध्ये वाद झाला. या वादाची तक्रार दाखल करून घरी जात असता ज्यांच्याविषयी तक्रार दाखल केली, त्यांनी मनात राग धरून तक्रारदार व त्याच्यासोबत असलेल्यांना मारहाण केली. मारहाण करणार्या सहा जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
कर्जत जामा मस्जीद विश्वस्त ट्रस्टचे निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या मिटींगमध्ये झालेल्या वादाची तक्रार शहाबाज हुसेन मुल्ला याने कर्जत पोलीस ठाण्यात केली. त्याच्यासमवेत जहुर निसार शेख, खलील जलगाव, मोजम कादिर पानसरे, निसार शेख आणि सैदू शेख करून हे सर्वजण घरी परत जात असताना 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास कर्जत बाजरपेठेकडे जाणार्या रस्त्यावर जहीर जमील खान याने तक्रारदार शहाबाज हुसेन मुल्ला व त्याचे सहकारी यांच्या गाड्या अडवून जहीर जमील खान व त्याच्या सहकार्यांनी त्यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. मारहण करून शिवीगाळी करून तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देऊन सोहेल सिद्दिक अन्सारी याने तेथील एक दगड हातात घेऊन त्या दगडाने साक्षीदार याचे डोक्याला मारून दुखापत केली आहे.
कर्जत पोलिसांनी जाहिर जलीम खान, युसुफ अश्रफ खान, अनु राजपूत, चिनू उर्फ संकेत साळुंखे, सुजल अनिल साळुंखे, सोहेल सिद्दिक अन्सारी या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार भोईर हे करीत आहेत.