पावणे सात लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील गणेशनगर येथे घरफोडी करण्यात आली. पावणे सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद ठाकूर हे व त्यांचे कुटुंबिय मंगळवारी (दि.18) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांकडे गावात गेले होते. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी ते परत आले. त्यावेळी घरातील मुख्य दरवाजाचा कुलूप तुटलेला दिसून आला. बेडरुमधील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने गायब झाल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांनी पोयनाड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्राथमिक तपासात घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने सोन्याचे मंगळसूत्र, कंठीहार, सोन्याचे सर असा एकूण सहा लाख 79 हजार 400 रुपयांचा ऐवज गायब केले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.