चौकशी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आश्वासन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे देशभरात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातदेखील 5 लाख 35 हजार घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजविक्री केंद्र थाटण्यात आली आहेत. मात्र, धक्कादायक म्हणजे, या शासकीय ध्वजविक्री केंद्रांवर उपलब्ध असणारे ध्वज हे ध्वजसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचे समोर आले आहे. दोन बाय एक या साईजमध्ये पॉलिस्टरमध्ये उपलब्ध असणारे ध्वज व्यवस्थितरित्या कटिंग करण्यात आलेले नाहीत. तसेच कापडदेखील कमी दर्जाचे आहे, अशा तक्रारी आहेत. यातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे देशाभिमान व जाणीव-जागृतीची ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उत्साहाने या उपक्रमात सहभागी व्हावे, हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत/पॉलिस्टर/लोकर/सिल्क/खादीपासून बनविलेल्या कापडाचे राष्ट्रध्वज वापरण्यात यावेत. मात्र, यावेळी भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता नागरिकांनी घ्यायची आहे. प्रत्येक गावात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करण्यात येणार आहे. यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात येणार असून, सर्व शासकीय इमारती/संस्थांवर ध्वजारोहण केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातदेखील यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्या-तालुक्यात तसेच शहरांमध्ये ध्वजविक्री केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणच्या केंद्रावर उपलब्ध असणारे ध्वज हे ध्वजसंहितेनुसार नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन प्रकारचे ध्वज पाहायला मिळत आहेत. एकामध्ये सफेद रंग हा योग्य प्रकारे आहे. तर, दुसर्या प्रकारच्या ध्वजामध्ये सफेद रंग शुभ्र नसून, तो मळका असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे ध्वजाची शिलाई कटिंग योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे ध्वजाचा कपडा एका बाजूने विरण्याची शक्यता आहे. तसेच काही कापडांमध्ये दर्जा सुमार असल्याने धागे निघालेले दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे ध्वज विक्री करण्यात येऊ नयेत. त्याऐवजी योग्य तर्हेचे ध्वज उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी होत आहे.
या उपक्रमाची जिल्हास्तरीय कार्यान्वयन समिती पुढीलप्रमाणे अध्यक्ष : जिल्हाधिकारी, सह-अध्यक्ष : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपाध्यक्ष : पोलीस अधीक्षक, सदस्य : विद्यापीठाचे कुलसचिव द्वारा प्रतिनिधी, नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, महाव्यवस्थापक-जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी, एमएसआरएलएम समन्वयक. सदस्य सचिव : जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत). एवढे सर्व अधिकारी या समितीत असतानाही अशा प्रकारचे कमी दर्जाचे ध्वज शासकीय विक्री केंद्रांवर आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ग्रामपंचायत, नगरपरिषद यांना ध्वज खरेदी करुन वाटण्यास सांगितले जात आहे. लोकांच्या हितासाठी जो पैसा खर्च करायला पाहिजे, तो अशा झेंड्यावर खर्च करणे, हेदेखील संयुक्तिक वाटत नाही. लोकांचे प्रश्न संपलेला हा देश नाही. रस्त्याचे प्रश्न आहेत. हे मानवी हक्कांचे प्रश्न सोडून, लोकांचे लक्ष विचलित करणे, हे अत्यंत चुकीचे वाटते. सदर बाब पत्रकारांनी शासकीय अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर तातडीने असे ध्वज बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र सायंकाळपर्यंत त्याच दर्जाच्या ध्वजांची विक्री होत होती.
तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत हे आहेत दहा प्रमुख नियम…
- तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.
- सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.
- तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल, तर (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.
- तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये. जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही.
- तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेषप्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही.
- एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे.
- फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे.
- तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.
- अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.