| पाली | वार्ताहर |
सुधागड किल्ल्याकडे जाणार्या पाच्छापूर फाटा ते दर्यागाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण कामासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या, निवेदने देऊन झाली. मात्र, काहीही फरक पडत नसल्याने संतप्त व त्रासलेल्या गावकर्यांनी अखेर एक अनोखी घोषणा केली आहे. पाच्छापूर ते पाच्छापूर फाटा सलग पाच मीटर डांबरी रस्ता दाखवा आणि भरगोस बक्षीस मिळवा! ही ती घोषणा असून, फेसबुकवर रस्त्याचा व्हिडीओ शेअर करून ही घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री, परिवहनमंत्री व रायगडच्या पालकमंत्री यांना टॅग करण्यात आले आहे.
मागील आठवड्यातच ग्रामस्थ रायगड जिल्हा परिषद उपअभियंता यांच्या पाली येथील कार्यालयात स्थानिक नागरिक गेले होते. मात्र, तेथे अधिकारी उपस्थित नव्हते व उपस्थित कोणीही त्यांची दखल घेतली नाही. त्यांनी मग रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले. याआधी देखील ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदन दिले आहे. मात्र, शासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
जिल्ह्यातील महत्वपूर्ण किल्ला सुधागडकडे जाणार हा मार्ग आहे. तसेच या रस्त्यावर 11 गावं आणि वाड्या अवलंबून आहेत. शिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील हा मार्ग महत्वाचा आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची अतिशय खराब अवस्था झाली आहे. रस्त्यावर आता फक्त दगड, खडी व मातीच शिल्लक आहे. यावरून प्रवास करणे अतिशय जिकरीचे व धोकादायक आहे. लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांपासून या रस्त्याच्या नुतनीकरणा संदर्भात अनेक पत्रव्यवहार करून त्याचा पाठ पुरावा करूनही संबंधित खात्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. असे उमेश तांबट यांनी सांगितले की सदर रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित खात्याने कोणतेही पाऊल न उचलल्यास 11 गाव व वाड्यांतील ग्रामस्थ लवकरच आंदोलन करणार आहेत. शिवाय शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही बक्षिसाची घोषणा केली आहे. निवेदन देतेवेळी उमेश तांबट, संतोष बावधाने, रोशन बेलोसे व खुमाजी बर्गे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या साईटवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यास लागलीच या कामाला सुरुवात करून लोकांची सोय केली जाईल. पाली कार्यालयात दर बुधवारी उपलब्ध असतो.
व्ही.बी. नाईक
उपअभियंता, राजिप, विभाग पेण







