राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साखळी उपोषण
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत-पनवेल जुना 15 मीटर (50 फूट) डीपी रोडचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने कर्जतमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कर्जत शहरातील टिळक चौक येथे सोमवार, दि. 25 मे रोजी सुरू झालेल्या या उपोषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहराध्यक्ष ॲड. भाऊसाहेब मोरे, शहर उपाध्यक्ष राम देशमुख आणि शहर सचिव दिलीप बुंधाटे सहभागी झाले आहेत.
कर्जत चारफाटा परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिक, दररोज कर्जत-पनवेल मार्गावर प्रवास करणारे प्रवासी तसेच मुंबईकडे वाहनाने ये-जा करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. मंजूर असलेला 15 मीटर (50 फूट) डीपी रोड अद्याप पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयासह विविध शासकीय यंत्रणांकडे 31 जानेवारी 2026 पासून ते 12 मे 2026 पर्यंत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, नगरपरिषदेकडून केवळ ‘पुन्हा ठराव घेतो’ अशी उत्तरे देण्यात आली. अनेक वेळा पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने लोकशाही मार्गाने आणि सनदशीर पद्धतीने साखळी उपोषण सुरू केल्याचे ॲड. भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले.
