। अलिबाग । प्रमोद जाधव ।
जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने ग्रामपंचायत स्तरावर कंपोस्ट पीटची संकल्पना राबविण्यात आली. गावागावात कंपोस्ट पीट उभारण्यात आले. परंतु, या कंपोस्ट पीटवर कचर्याचा डोंगर उभा राहू लागला. गावाच्या वेशीवरच कचर्याचा ढिगारा असल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. ही कंपोस्ट पीट योजना बारगळली असल्याचे चित्र समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारहून अधिक आहे. दोन हजारहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, रुग्णांना तात्काळ रुग्ण सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 54 प्राथमिक आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्र आहेत. कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन ग्राम पातळीवर नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकला जात होता. अनेक रस्त्यांची साईटपट्टी कचराकुंडीचा अड्डा बनली. त्याच ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढू लागल्याने अपघात होण्याची तसेच कुत्र्यांचा हल्ला होण्याची भिती वाढली आहे.
गाव पातळीवरील कचर्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद स्वच्छता मिशन विभागने पुढाकार घेतला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आणि पंधरा वित्त आयोगातून निधीची तरतूद करून गावागावात कंपोस्ट पीट बांधण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील गावांमध्ये कंपोस्ट पीट बांधण्यात आले. परंतु, या कंपोस्ट पीटचा वापर कचराकुंडी म्हणून होऊ लागला. कचर्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील कचर्याचे व्यवस्थानपन करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने केलेला प्रयत्न असफल ठरला. स्थानिक प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या कंपोस्ट पीट योजना पुर्णतः बाळरगली असल्याचे दिसून येत आहे.
गाव स्वच्छ ठेवू अभियान
रायगड जिल्ह्यात 1 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात लोकसहभागातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. अभियानांतर्गत गट विकास अधिकारी हे पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांची कार्यशाळा व बैठक घेतील. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाईल. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे सूचना फलकावर माहिती प्रसारित करण्यात येईल. 1 मे ते 10 मे या कालावधीत गावातून संकलित केलेला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मिती नंतर 15 सप्टेंबर पर्यंत कंपोस्ट खड्ड्यात तयार झालेले खत उपसण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी गाव पातळीवर कंपोस्ट पीट उभारण्याच्या सुचना केल्या होत्या. ओला व सुका असा वेगवेगळ्या प्रकारचे कचर्याचे वर्गीकरण करण्यास सांगितले. ग्रामपंचायतीमार्फत कंपोस्ट पीट बांधण्यात आले. गावाच्या वेश्वीवर कंपोस्ट पीट बांधले. परंतु, कचर्याचे वर्गीकरण योग्य पध्दतीने न केल्याने कंपोस्ट पीट कचराकुंडी बडली. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कंपोस्ट खड्डा भरू गाव स्वच्छ ठेवू अभियान सुरु केले आहे. ग्रामपंचायतीसह वेगवेगळ्या संस्था, संघटना आदी लोकसहभागातून या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
– शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
पाणी व स्वच्छता विभाग, रायगड जिल्हा परिषद