। चिरनेर । प्रतिनिधी ।
ग्रामीण नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यात मला आनंद वाटतो. ही ग्रामीण नाट्य संस्कृती गावागावात अभंग राहावी यासाठी मी प्रयत्नरत राहीन. त्यासाठी नाट्यकलाकारांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही शेकापचे नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, प्रीतम म्हात्रे यांनी दिली.
उरण तालुक्यातील गोवठणे येथील जय हनुमान नाट्य मंडळाच्या वतीने गावदेवी भवानी मातेच्या यात्रेच्या निमित्ताने शिव आलिंगन या शिवचरित्रावर आधारित, ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे आयोजन शनिवारी, दि. 26 रोजी गोवठणे रंगभूमीत करण्यात आले होते. त्यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नाट्यप्रयोगाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक एल.बी. पाटील, दिग्दर्शक पांडुरंग पाटील, अष्टगंध कलामंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, नाटककार हसूराम पाटील, नाटककार धनेश्वर म्हात्रे, रंगकर्मी विनोद म्हात्रे, महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, अभिनेत्री वैशाली मोहिते, उपाध्यक्षा वर्षा म्हात्रे, सुधाकर पाटील, प्रेम म्हात्रे, वैभव पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाचे लेखन शारदाकुमार शिसकर यांचे तर दिग्दर्शक पांडुरंग पाटील यांना नाटकातील पात्रे सजीव करण्यात यश आले आहे. निर्मिती लक्ष्मीकांत म्हात्रे यांची आहे. सूत्रधार सुरेश म्हात्रे यांच्या मेहनतीचे सोने झाले. सल्लागाराची भूमिका रामनाथ म्हात्रे यांनी पार पाडली. राजू म्हात्रे यांचे प्रासंगीक संगीत प्रेक्षकांना भावले. उदय तांगडी (ठाणे) यांची रंगभूषा उठावदार होती. वेशभूषा अमृत म्हात्रे, पार्श्वगायन जितेंद्र म्हात्रे यांचे आहे. जय हनुमान नाट्य मंडळाचे व राजा जोशी यांचे भव्य दिव्य नेपथ्य पाहून रसिक भारावून गेले. ध्रुवराज म्हात्रे यांच्या ध्वनी संकलनाने नाटकाची उंची वाढविली.