तात्काळ चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील पुई गावानजीक असणार्या लघुपाटबंधारे कार्यालयात शनिवार, दि.13 ऑगस्ट रोजी संगणक चोरीची घटना घडली. कार्यालयात सलग आलेल्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्याने ही संधी साधली. दि.15 ऑगस्ट रोजी हा प्रकार लक्षात येताच पाटबंधारे विभागाने तक्रार नोंदवली. कोलाड पोलिसांनी तात्काळ वेगाने चक्र फिरवून पुई गावातील चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद केले.
कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत असणार्या लघुपाटबंधारे उपविभाग क्र.3 या कार्यालयात संगणक चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर कार्यालयाच्या मागील बाजूला असणार्या व्हरांड्याच्या लोखंडी ग्रीलमधून प्रवेश करीत चोरट्यांनी दरवाज्याची कडी उघडली. त्यानंतर कार्यालयाच्या स्लाडींगची खिडकी उघडून आत प्रवेश केला व लिनोव्हा कंपनीचा 20 इंची एलसीडी, फिगर कंपनीचा पीसीयू लॉजिटेक कंपनीचा कीबोर्ड व माऊस केबलसह एकूण 49,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याविषयी कोलाड पाटबंधारे विभागाच्या लक्षात येताच कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याविषयी कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु करून पुई गावातील पूर्वेश कदम (32) याला मुद्देमालासहित पकडले असून, याविषयी अधिक तपास सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जी. महाडिक करीत आहेत.