लायन्सच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहाचा समारोप

जिल्ह्यात सेवाकार्याची प्रेरणादायी चळवळ; विविध सामाजिक, पर्यावरणपूरक उपक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

इंटरनॅशनल लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑक्टोबर सेवा सप्ताहचा भव्य समारोप वाशी, नवी मुंबई येथे उत्साहात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने संपूर्ण जिल्ह्यात सेवाकार्याची प्रेरणादायी चळवळ उभी केली. पारंपरिक महाराष्ट्रीयन लेझीम आणि ताशाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रथम जिल्हा ग्लोबल सर्विस टीमचे अध्यक्ष अनिल म्हात्रे यांनी ऑक्टोबर सेवा सप्ताह दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि साध्य केलेल्या यशाचा आढावा सादर केला.

जिल्हा ग्लोबल सर्विस टीमचे अध्यक्ष अनिल म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामध्ये सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘एकत्र येऊन सेवा करूया’ हा संदेश देत 1 ते 9 ऑक्टोबर 2026 या नऊ दिवसांच्या कालावधीत जिल्हाभरात विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. कर्करोग जनजागृतीसाठी कार व दुचाकी रॅलींचे आयोजन करण्यात आले. कर्करोग रुग्णालयाला रेफ्रिजरेटर भेट देऊन रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला.

ग्रामीण विद्यार्थ्यांना सायकली आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. अन्नदान, नेत्रतपासणी शिबिरे, नेत्रदान जनजागृती, मधुमेह तपासणी व जनजागृती, मानसिक आरोग्यविषयक कार्यक्रम, बालआरोग्य तपासणी शिबीरे आणि रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य व समाजकल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा प्रांतपाल प्रवीण सरनाईक, विजय कुमार राजू, पंकज मेहता, मनीष लाडगे, फिरोज कात्रक, विजय गणात्रा, डॉ. नमिता मिश्रा, नयन कवळे तसेच विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या प्रदर्शनांमधून सर्जनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यामध्ये 30 पेक्षा कमी सदस्य असलेल्या क्लबच्या गटातील पुरस्कारप्राप्त क्लब पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी, संयुक्त द्वितीय क्रमांक: लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनियल आणि लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड, तृतीय क्रमांक: लायन्स क्लब ऑफ नागोठणे व लायन्स क्लब ऑफ वाशी रुबी संयुक्त तसेच 30 पेक्षा अधिक सदस्य असलेल्या क्लबच्या गटात लायन्स क्लब ऑफ खोपोलीने प्रथम क्रमांक मिळविला. लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाशी आणि लायन्स क्लब ऑफ अलिबाग यांनी संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावला, तर लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सने तृतीय क्रमांक मिळविला. लिओ क्लब गटात लिओ क्लब ऑफ अलिबागने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

पर्यावरण रक्षणाचा संदेश
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने 1,500 झाडांची लागवड करण्यात आली. ई-कचरा जनजागृती, ई-कचरा संकलन आणि स्वच्छता मोहिमांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. आदिवासी भागातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या सुविधांसाठी सौरऊर्जा पॅनेल उपलब्ध करून देण्यात आले.
Exit mobile version