प्रसाद कुष्टे यांचा आंदोलनाचा इशारा
| गुहागर | प्रतिनिधी |
तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीट गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र, त्यांची कामे अर्धवट व निकृष्ट झाल्याने या गटारात मोकाट जनावरे पडून ती जखमी होत आहेत. याविरोधात गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे यांनी संताप व्यक्त करुन निकृष्ट बांधकामाविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी जानवळे फाटा ते मच्छीमार्केटपर्यंत रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीटची गटारे बांधण्यात आली. काही गटारांची कामे अपुर्ण ठेवण्यात आली आहेत. तर, जी कामे पूर्ण झालीत त्यांची बांधकामे निकृष्ट झाली आहेत. त्यांचे काँक्रीट पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्याचबरोबर काँक्रीटला तडे जाणे व बांधकाम ढासळणे असे प्रकार सुरुच आहेत. मध्यंतरी गटारात येथून ये-जा करणारे नागरिकही पडण्याचे प्रकार घडलेले आहेत. दरम्यान, शनिवारी (दि.17) कोकणरत्न हाँटेल समोरील काँक्रीट गटारात एक वासरु पडून अडकले आणि जखमी झाले. अशावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबू तेलगडे व काही नागरिकांनी या वासराला बाहेर काढले. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे येथील काँक्रीट गटारे जीवघेणी ठरली असून अपुर्णावस्थेतील गटारांची कामे पूर्ण करुन जी तुटलेली आहेत त्यांचीही दुरुस्ती व्हावी, अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा प्रसाद कुष्टे यांनी दिला आहे.