| चिपळूण | प्रतिनिधी |
नगर परिषदेच्यावतीने दर रविवारी लोकमान्य टिळक स्मारक आणि भोगाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वाचनालयांच्यावतीने ‘वाचू आनंदाने’ हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. सकाळी आठ ते दहा या वेळेत विद्यार्थी व नागरिक आपल्याला हवे ते पुस्तक वाचण्याचा आनंद घेत आहेत. यावेळी 18 मे रोजी वाचकांनी रामशेठ रेडीज यांच्या एसआर फार्म येथील मियावाकी जंगल या ठिकाणी पुस्तक वाचन व त्यानंतर निसर्ग वाचनाचा देखील आनंद लुटला. या उपक्रमासाठी चिपळूण ग्लोबल टुरिझमचेही सहकार्य लाभले आहे.
रामशेठ रेडीज यांच्या मियावाकी जंगलात बसून ग्रंथालयाचे कर्मचारी, नगर पालिकेचे कर्मचारी व वाचकांनी एक तास वाचन केले. त्यानंतर निसर्ग वाचनाचा उपक्रम राबवण्यात आला. रामशेठ रेडीज, विश्वास पाटील व अजित जोशी यांनी येथील जंगलाविषयीची माहिती दिली. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, लेखक-साहित्यिक प्रकाश देशपांडे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, अशोक भुस्कुटे, अश्विनी भुस्कुटे, सुनिल खेडेकर, प्राची जोशी, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, शहानवाज शहा, रमा करमरकर, विलास महाडिक व कैसर देसाई आदी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रकाश देशपांडे, विशाल भोसले, बापू काणे यांनी पुस्तकांबरोबर निसर्ग वाचन किती आवश्यक आहे, हे सांगितले. मुख्याधिकारी भोसले यांनी निसर्ग वाचता येईल, परंतु तो आधी वाचवायला हवा, अशी भावना व्यक्त केली. रामशेठ रेडीज यांनी सर्वांना धन्यवाद देत, पुन्हा पुन्हा निसर्गाशी एकरुप होत राहू, अशी भावना व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले. लहान मुलांसह वयोवृद्धही या निसर्ग वाचनाच्या उपक्रमात सहभागी झाले होते. पुढच्या रविवारी (दि.25) गोवळोट येथील श्री देवी करंजेश्वरी मंदिरात वाचू आनंदाने हा उपक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.