सुकवत ठेवलेली मासळी खराब
| पालघर | प्रतिनिधी |
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच भाईंदर पश्चिमेच्या उत्तम परिसरात अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने उदरनिर्वाहासाठी मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मासळी सुकवून तीची विक्री केली जाते. परंतु, अवकाळी पावसामुळे सुकवत ठेवलेली मासळी खराब झाली आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
उत्तन परिसरात कोळी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांचा मूळ व्यवसाय मासेमारी असून, परिसरात 800 बोटी आहेत. मच्छीमारांचा शेवटचा हंगाम सुरू झाला आहे. या शेवटच्या हंगामात मिळालेले मासे सुकवून ते पावसाळ्यात विक्री केले जातात. त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. परंतु, शेवटच्या हंगामाताच अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. 22 ते 30 मे दरम्यान वादळी वाऱ्यांचा इशारा असल्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी पुन्हा बाहेर येण्यासाठी निघाल्या आहेत. परत आलेल्या बोटी मासेमारीसाठी पुन्हा समुद्रात जातील की नाही, याची शाश्वती नाही. मासेमारीसाठी समुद्रात बोट गेल्यानंतर परत येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च येतो. अनेक मच्छिमार कर्ज काढून मासेमारीसाठी जात आहेत. परंतु, मासे कमी मिळाल्याने झालेला खर्च देखील मिळत नाही. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान होत आहे. त्यातच अनेक मच्छीमारांनी मासे सुकविण्यासाठी बाहेर टाकले होते. ते देखील अवकाळी पावसात भिजून खराब झाले आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे काही महिने मासे कमी प्रमाणात मिळत होते. आता शेवटच्या हंगामात मासे मिळत आहेत. परंतु, मे महिन्यात अवकाळी पावसामुळे मच्छीमारांना समुद्रात मासे मिळाले नाहीत.त्यामुळे केलेला खर्च देखील निघत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. त्याचप्रकारे मच्छीमारांना देखील शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी उत्तन येथील मच्छीमारांनी केली आहे.
पावसामुळे उत्तन समुद्र किनारी मासळी सुकवलेली असताना संपूर्ण मासळी खराब झाली आहे. त्यामुळे कोळी स्त्रिया रडू लागल्या आहेत. गेले चार महिने मासळीचा दुष्काळ होता. आता शेवटच्या हंगामात हाती आलेली मासळी वाया गेली आहे. त्यामुळे मच्छीमारांचे भरपूर नुकसान झाले आहे. शासनाने आता तरी शेतीला आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते. त्याप्रमाणे मच्छिमार कोळी समाजाला संबंधित प्रशासनाने मदत करावी.
शर्मिला बगाजी,
माजी नगरसेविका