दहा कामगारांना वायूबाधा
| पालघर | प्रतिनिधी |
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यामधील दहा कामगारांना वायुबाधा झाल्याची घटना रविवारी (दि.18) पहाटेच्या सुमारास घडली आहे. वायुबाधा झालेल्या 11 कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅमलिन फाईन सायन्स या रासायनिक कारखान्यात रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास डायमिथेन सल्फेट या वायूची अचानक गळती झाली. त्यावेळेस कामावर उपस्थित कामगारांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र, सकाळी कामावरून घरी गेल्यानंतर 11 कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळ सारखा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे खबरदारी म्हणून कंपनी व्यवस्थापनाने त्यांना बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अबू बकर (30), आशिष देशमुख (31), नरेंद्र ठाकूर (33), अभिषेक देव (28), मंगल यादव (47), मनीष यादव (20), विजय पाल (22), जितेंद्र चौधरी (36), सुनील पाटील (29), केतन म्हात्रे (29), अबू बकर (30) आणि मनीष कुमार (29) असे या बाधित कामगारांचे नाव आहे.
दरम्यान, उपचारासाठी दाखल केलेल्या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. वायुगळती प्रकरणी बोईसर पोलीस आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यात वायुगळती झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्याचबरोबर बाधित कामगारांची भेट घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.