वाहनचालकांचे हाल थांबले
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावाला वळसा घालून सहज बाहेर पडता येईल असा रस्ता म्हणून पेशवाई रस्ता ओळखला जात होता. या रस्त्याची दुरवस्था यामुळे अनेक वर्षे या रस्त्याने कोणाही वाहन वाहतूक करीत नव्हते. मात्र आंबिवली माणगाव येथील रेल्वे फाटक ते बोरले या भागातील रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे. दरम्यान, आता या रस्त्यावर काँक्रीटचा एक थर टाकण्यात आल्याने या रस्त्याने आता वाहनाची वर्दळ वाढली असून संपूर्ण काँक्रीटीकरण होईल त्यावेळी नेरळ गावातील वाहतील कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे.
कर्जत-नेरळ-कल्याण राज्य मार्ग रस्ता आणि माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याचे मधोमध नेरळ गाव आहे. नेरळ गावच्या अलीकडे पलीकडे जाणारी वाहने ही पर्यायी रस्ते सुस्थितीत नसल्याने नेरळ गावातून ये-जा करीत असतात. त्यामुळे नेरळ गावातील रेल्वे फाटक असलेल्या पाडा गावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. नेरळ गावात येणारी वाहनांमुळे नेरळ गाव वाहतुकीच्या केंद्रस्थानी आले होते. हे लक्षात घेऊन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ गावातील वाहतील कोंडीवर मात करण्यासाठी पेशवाई रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आंबिवली माणगाव येथे असलेले रेल्वे फाटकापासून नेरळ-कशेळे या राज्यमार्ग रस्त्यावर बोर्ले गावच्या हद्दीत असलेला रस्ता काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामाचा शुभारंभ मागील वर्षी आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाला होता.
नेरळ गावात न येता परस्पर बाहेर पडता येईल, असा रस्ता समजला जाणारा पेशवाई रस्ता सध्या काँक्रिटीचा बनत आहे. या रस्त्यावर जेएसबी काँक्रीटीकरण थर टाकण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेले मोठ मोठे खड्डे गायब झाले असून नेरळ गावात कोणतेही काम नसलेली वाहने परस्पर या रस्त्याने साई मंदिर येथे पोहचत आहेत. सध्या या रस्त्याचे अर्धेच काम पूर्ण झाले असून वाहनचालक यांना दिलासा मिळाला आहे. रस्त्यावर काँक्रीटचा एकच थर टाकल्यानंतर देखील वाहने सुसाट पुढे जाऊ लागली असल्याने वाहनचालक या पर्यायी मार्गाचा अवलंब करू लागली आहेत. नेरळ गावाला पर्यायी रस्ता म्हणून या पेशवाई रस्त्याच्या -बोर्ले ते माणगाव फाटक या भागातील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहने सुसाट वेगाने मार्गस्थ होत आहेत. माणगाव आंबिवली फाटकापासून पुढे कल्याण-कर्जत रस्ता जोडणारा भागदेखील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काँक्रिटीचा बनवला जात असल्याने हा रस्ता देखील वाहनचालक यांच्यासाठी मदतीला येत आहे. गेली 25 वर्षे या रस्त्यावर शासनाने केवळ खड्डे भरण्याची कामे केली होती आणि आता हा रस्ता काँक्रीटचा बनला जात असल्याने अनेक वर्षाची समस्या सुटली आहे.
