मिनी ट्रेन मार्गालगतच्या घरांचे सर्वेक्षण करा: सीताराम कुंभार

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरात येत असलेल्या मिनी ट्रेन रेल्वे मार्गाला लागून काही निवासी घरे आहेत. त्या निवासी घरांबाबत माथेरान पालिकेने रेल्वेकडून मोजमाप करून घ्यावे आणि त्या सर्व 44 मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन माथेरान नगरपरिषदेमधील विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांच्याकडून नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

नेरळ- माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गावर अमनलॉज ते माथेरान स्टेशन या भागात रेल्वे मार्गिकेच्या आजूबाजूला 44 रहिवाशी घरे आहेत. रेल्वे मार्गालगत असलेल्या 44 रहिवासी घरांचा आणि मालमत्ता धारकांचा एक संयुक्त सर्व्हे करण्याबाबत माथेरान नगरपरिषदेकडून पत्र व्यवहार करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने माथेरान नगरपरिषदेला फेब्रुवारी महिन्यात जवळपास तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आजमितीपर्यंत माथेरान नगरपरिषद प्रशासन यांच्याकडून संयुक्त सर्वेसाठी कोणतेही सहकार्य करण्यात येत नाही. दोन महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकपासून रहिवासी भागात रेल्वेचे मार्किंग करून खांब उभे केले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माथेरानमधील स्थानिक लोकांचे नुकसान होऊ नये. त्या ठिकाणी लोखंडी खांब हटवावे यासाठी माथेरान नगरपरिषदेने पुढाकार घ्यावा अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. मिनी ट्रेन मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या आणि माथेरान पालिकेने मालमत्ता कर लावत असलेल्या 44 घरांना संरक्षण देण्यात यावे यासाठी माथेरान पालिकेने रेल्वे बरोबर संयुक्त पाहणी करावी अशी मागणी करणारे निवेदन सीताराम कुंभार, सचिन दाभेकर, किरण पेमारे, अनिता रांजणे आदीच्या उपस्थित देण्यात आले.

Exit mobile version