| सोगांव | वार्ताहर |
दी लाईफ फाऊंडेशनतर्फे मंगळवार (दि.25) अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांसाठी जिल्हा परिषद शाळा वरसोली येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत मासिकपाळी, आरोग्य आणि स्वच्छता, तसेच बालसंगोपन योजने विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच बाललैंगिक शोषण आणि बाल हक्क याविषयी सेविका आणि पालकांची भूमिका काय असावी, बाल लैंगिक शोषणाच्या केसेस आढळल्यास बाल कल्याण समितीस संपर्क करावा, या विषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी याविषयी निर्माण होणार्या शंका विचारून त्यांच्या शंकांचे समाधान मिळविले.
या कार्यशाळेचा उद्देश्य हा अंगणवाडी सेविकांनी आपल्या अंगणवाडीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करून किशोरी मुलींना आणि महिलांना वरील विषयांवर मार्गदर्शन करणे हा आहे. या कार्यशाळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, भाग्यश्री पाटील, उल्का कुलकर्णी, विनोदिनी मोकल, दिप्ती मोकल यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे शिलानंद इंगळे, पूर्णिमा ढोबळे, मुस्कान शेख, प्रणय ओव्हाळ, राखी राणे यांनी परिश्रम घेतले.