नऊ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडल्याची कबुली

विधानपरिषदेत आ. जयंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिले उत्तर

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या समुद्रकिनारी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेत लेखी उत्तरात ही माहिती उघड झाली. या संदर्भात आ. जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता. सागरी सुरक्षा सक्षम करण्यासाठी अटक आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे. वेगवेगळ्या यंत्रणाशी समन्वय वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, आक्षी, नागाव, श्रीवर्धन अशा वेगवेगळ्या समुद्रकिनारी 27 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 228 किलो वजनाची चरसची पाकीटे सापडली होती. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापर्यंत मुख्य गुन्हेगार सापडला नाही. उरण येथील जेएनपीटी बंदरातून मालवाहतूक होत असताना अमली पदार्थ, व अन्य मौल्यवान वस्तूंची तस्करी होत असल्याचेही आ. जयंत पाटील यांनी लेखी प्रश्नांद्वारे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. सागरी सुरक्षा सक्षम करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या असा सवालही उपस्थित केला. या संदर्भात उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी सापडलेल्या अमली पदार्थांबाबत पोलीस तपास करीत आहेत.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून होणाऱ्या तस्करीवर नवी मुंबई पोलीस आयुक्ताच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. आरोपीविरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच सागरी सुरक्षा सक्षम करण्यासाठी पोलीस, तटरक्षकदल, नौसेना, सीमा शुल्क विभाग यांच्यामध्ये समन्वय वाढविण्यासाठी जिल्हास्तरिय सागरी सुरक्षा समन्वय समितीची मासिक बैठक आयोजित केली जात आहे. सुरक्षा यंत्रणाच्या सदस्यांची समुद्रात संयुक्त गस्त समुद्रात घातली जाते. संशयित हालचाली दिसून आल्यास 1093 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सूचित केले आहे. सतर्कता तपासण्यासाठी नियमीत सागरी सुरक्षा अभियान राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version