आराखडा न सादर करता मागवल्या सूचना
| सुधागड/पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायत क्षेत्रासाठी प्रारूप विकास योजना तयार करण्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. आराखडा आधी सादर न करता सूचना मागितल्यामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले आणि अखेर बैठक अर्धवट संपवावी लागली.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 21 (1) व 21 (2) नुसार पाली नगरपंचायत क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्याचा इरादा शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार नगररचना विभागामार्फत काम सुरू असून रायगड-अलिबागचे सहाय्यक संचालक महेंद्र पवार यांची नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विकास योजनेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद तसेच नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी पाली भक्तनिवास क्र. 1 सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, सर्व नगरसेवक, प्रभारी प्रशासकीय अधिकारी कोमल कराळे, नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान अतिक्रमण, डंपिंग मैदान, रस्ते आदी मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना नागरिकांनी आराखडा आधी सादर करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून सूचना नोंदविण्याचे आवाहन केले. या प्रक्रियेदरम्यान काही नागरिक आणि अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बैठक अर्धवट संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विकास योजनेबाबत नागरिकांची मते नोंदविण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली.
