| पेण | प्रतिनिधी |
पेण नगर परिषद मतदार यादीत प्रभाग विभाजन हरकतीवर तक्रारींचा पाऊस पडला आहे. अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारी सादर केल्या आहेत.
पेण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांचे त्यांच्या विधानसभा मतदार यादीतील वास्तव्याच्या पत्त्यानुसार संबंधित प्रभागांमध्ये विभाजन करण्यात येते. असे विभाजन करताना जर एखाद्या मतदाराला चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास त्याबाबत त्यांना हरकत नोंदविता येतात. पेण नगर परिषदेने ज्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये अनेक मतदारांची नावे दुसर्या प्रभागात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. या बाबत नगरसेवक सतोष पाटील संजय म्हात्रे भूषण कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन हरकती नोंदवल्या.
याबाबत बोलताना जीवन पाटील यांनी सांगितले की, विधानसभेच्या मतदार यादी मध्ये नमूद असलेले सेक्शन ऍड्रेस हे बर्याचदा एकापेक्षा अधिक प्रभागांमध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे मतदार यादीचे विभाजन करताना स्थळ पाहणी करून प्रभाग रचनेच्या नकाशानुसार सदर मतदार असलेले क्षेत्र ज्या प्रभागात समाविष्ट होते त्याच प्रभागात त्यांचे नाव दर्शविले जाते. अशी कोणाची नावे असतील तर संबंधित मतदाराने त्या अनुषंगाने मतदार यादीतील अनुक्रमांक व त्याचा पत्त्यासह हरकत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जाची स्थळ पाहणी करून मतदाराचे नाव योग्य प्रभागात समाविष्ट करणे शक्य होऊ शकेल.