| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा हायस्कूल शाळेच्या बाजूच्या वाटेने स्मशान भूमीमार्गे जाताना सुमारे 13 लाख खर्चून बांधलेले नवीन मच्छी मार्केटचे कधी उद्घाटन होणार? मच्छी विक्रेते कधी त्यात बसून व्यवसाय करणार तसेच जुन्या मच्छी मार्केटची डागडुजी का झाली नाही. पडीक पडलेले जुन्या मार्केटचे काय होणार, का ही जागा परस्पर विकून बिल्डरांच्या घशात जाणार असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना आणि मच्छी विक्रेत्यांना पडले आहेत. भर उन्हात रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागल्याने त्रास होत असून, ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा रोडवर मच्छी विक्रेत्यांना भर दिवसा उन्हात उघड्यावर बसावे लागत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी गाड्या दोन्ही बाजूंनी आल्या की मच्छीच्या टोपल्या धडकतात, मच्छी रस्त्यावर पसरते आणि नुकसान होते. यामुळे गाडी चालकांसोबत भांडणतंटे होतात. संध्याकाळी अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावर बसून विक्री करावी लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. आमचा व्यवसायच घराचा आधार आहे. नवीन मार्केटमध्ये बसून सावली मिळेल, व्यवसाय सुरक्षित होईल, पण उद्घाटन का होत नाही अशी खंत मच्छी विक्रेत्या महिलांनी व्यक्त केली आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, नवीन मच्छी मार्केट बांधून तयार आहे, पण उद्घाटन का होत नाही हे मला माहित नाही, असे त्यांनी उत्तर दिले. ग्रामस्थांनी लवकरात लवकर उद्घाटन करुन जुन्या मच्छी मार्केटच्या भविष्याबाबत स्पष्ट धोरणाची मागणी केली आहे. ग्रामस्थ आणि मच्छी विक्रेत्यांच्या या मागणीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत आहे. या प्रकरणात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी लवकर स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.






