सायन-पनवेल महामार्गावर कोंडी

| खारघर । वार्ताहर ।
सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाक्यासमोर रोडपाली पुलावर बस बंद पडल्याने सोमवारी खारघर ते सीबीडी दरम्यान जवळपास दोन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर वाहतूक पोलिसांनी मेकॅनिक आणून बंद पडलेली बस सुरू केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. सायन-पनवेल महामार्गावर सीबीडीकडून पनवेलच्या दिशेने जाणारी एसटी महामंडळाची बस अचानक बंद पडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसचे एअर ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडली. त्यामुळे सीबीडी ते खारघर टोलनाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी बाहेरून मेकॅनिकला बोलावून बस दुरुस्ती केल्यानंतर ती मार्गस्थ झाली आणि वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली. दुपारी बारा ते दोन दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांसह चालकांना नाहक ताटकळत राहावे लागले.

Exit mobile version