कोकणातील रिफायनरीला काँग्रेसचा विरोध

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा खुलासा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणातील रिफायनरीला काँग्रेसचा विरोधच असल्याचे मत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी जाहिर केले आहे. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी रिफायनरीविषयी काँग्रेसची भूमिका मांडली.
यावेळी संवाद साधताना, रिफानरी प्रकल्पासंदर्भात स्थानिकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. प्रकल्प भागातील स्थानिकांमध्ये दहा टक्के लोकांचे समर्थन असून उर्वरितांचा विरोध आहे. तसेच नाणार परिसराच्या आजूबाजूला असलेल्या भागातील अनेक बेरोजगारांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे ते या प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिले आहेत. पण बहुतांश स्थानिकांचा प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोधच असल्याची माहिती त्यांनी दिली. तर आमच्या पक्षाचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे अधोरेखित करत 29 ऑक्टोबर रोजी दौर्‍यावर येणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रिफायनरीसंदर्भात दोन्ही मत प्रवाह ऐकून घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे सध्या तो विषय आमच्या दृष्टीने संपला आहे. पुन्हा तसा विषय झालाच, तर त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Exit mobile version