काँग्रेसचे रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेल्या कथित वागणुकीविरोधात गुरुवारी (दि.23) अलिबागमध्ये काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस भवनातून काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला. मोदी हटाव आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले.
अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील थळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथे प्रथम निदर्शने करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस भवन ते मारुती नाका, बालाजी नाका, महावीर चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा भव्य मोर्चा काढण्यात आला. पायी निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनात माजी अध्यक्ष योगेश मगर, नगरसेवक समीर ठाकूर, काका ठाकूर, उमेश ठाकूर, भास्कर चव्हाण, आकाश राणे, अभय म्हामुणकर, प्रभाकर राणे, सरोज डाकी, कृष्णा भोपी, ॲड. दिनेश सोष्टे, शैलेश घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देताना सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलनात सहभागी युवकांवरील पोलीस कारवाईचा निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा आणि राहुल गांधी यांना दिलेल्या कथित वागणुकीचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी महायुती सरकार व भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मोर्चाची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झाली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, लोकशाही मूल्यांची कथित पायमल्ली आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक कारवाईविरोधात काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला.






