समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस कधीच मागे राहणार नाही

प्रवीण उर्फ बंडूशेठ क्षीरसागर यांचे प्रतिपादन

| खोपोली | वार्ताहर |

विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी शासकीय दाखले जमा करताना दमछाक होत असल्याची बातमी खोपोलीतून प्रसिद्ध झाली आणि त्याची दखल तात्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेवून विद्यार्थ्यांना तात्काल दाखले मिळवून देण्यासाठी शिबीरे सुरू केली होती. आताच्या सरकारने नाव बदलून ‘शासन आपल्या दारी’ अशी योजना सुरु केली असल्याचा टोला जिल्हा सरचिटणीस प्रविण क्षिरसागर यांनी लगावत खोपोलीत काँग्रेसने आंदोलने केली. त्याची नोंद घेतली जाते म्हणूनच भविष्यात खोपोलीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीने रस्त्यावर उतरणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्व. पंडित जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी यांच्या पर्यंत काँग्रेस पक्षासोबत खोपोलीतील क्षीरसागर कुटुंबीय नेहमीच सोबत राहिले आहेत. क्षीरसागर कुटुंबीयांना जसा राजकीय संदर्भ आहे, त्याचप्रमाणे सामाजिक जडणघडणीत त्यांचा सहभाग देखील महत्वाचा आहे. खोपोली ग्रामपंचायतीपासून खोपोली नगरपरिषदेच्या आजवरच्या वाटचालीत क्षीरसागर कुटुंबीयांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.

तिसऱ्या पिढीतील प्रवीण उर्फ बंडूशेठ यांची रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण उर्फ बंडू शेठ यांनी युवक काँग्रेस पासून आपल्या राजकिय कारकिर्दीची सुरुवात केली. ऑटो रिक्षा मधून प्रचार करणे, असो वा पक्ष कार्याचे पोस्टर बॅनर लावण्यापर्यंत प्रत्येक काम त्यांनी ईमान इतबारे केले आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पहिला वहिला सर्वसामान्य विद्यार्थी वर्गासाठी सर्व प्रकारचे शासकीय दाखले निःशुल्क पद्धतीने वाटप करण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाची दखल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेऊन त्यांनी त्या स्वरूपाचे उपक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यास सुरुवात केली. गेले अनेक वर्षे कोणतेही पद नसताना देखील अत्यंत निष्ठेने त्यांनी पक्षाचे काम केले आहे. 2012 पासून आजतगायात त्यांनी समर्थपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका परखडपणे मांडण्याचे काम नित्यनेमाने सुरू ठेवले आहे.

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी प्रवीण क्षिरसागर यांची नियुक्ति केल्यानंतर गुरूवारी पक्ष कार्यालय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष अबू खोत, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जाँन, प्रसिद्धी प्रमुख सागर जाधव, इंटकचे शहर अध्यक्ष अरूण गायकवाड उपस्थित होते. यावेळी, पक्षाच्या माध्यमातून खोपोलीतील नागरी सुविधा, शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी, पर्यवारणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम यांच्यासह नगरपालिकेतील गलथान कारभावर अंकुश ठेवण्यासाठी लढा देणार असल्याचेही क्षिरसागर म्हणाले आहेत.

Exit mobile version