| रसायनी/खोपोली | प्रतिनिधी |
दुर्घटनाग्रस्त ईर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबीर लावण्यात आले होते.
शनिवारी दिवसभरात विविध प्रकारचे कागदपत्रे व संजय गांधी योजनेअंतर्गत अनाथ 16, विधवा 5, श्रावणबाळ 1 असे लाभ संबंधितांना देण्यात आले. त्याचप्रमाणे 42 व्यक्तींना रेशनकार्ड व 57 जणांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले. याबरोबरच 41 कुटुंबाना सानुग्रह अनुदानाचे देखिल वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबास 5000 याप्रमाणे 2 लाख 15 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच, जीवनावश्यक वस्तूंचे देखिल वाटप करण्यात आले.
या सर्व नागरिकांना स्वतंत्र शासकीय ओळख देण्याचा व त्यासाठी तातडीने अत्यावश्यक दाखले वितरण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी घेतला. त्यानुसार सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा कामाला लागली. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी संबंधित तालुक्यातील अधिकारी यांची या कामासाठी नेमणूक केली. जिल्हाधिकारी यांनी स्वतः या सर्व बाबींची पूर्तता करून घेतली त्यामुळे जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी खंबीर असल्याची जाणीव या ग्रामस्थांना झाली आहे.