रोपे कुजण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त
। पाताळगंगा । वार्ताहर ।
सातत्याने गेले काही दिवस पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणीच पाणी निर्माण झाले आहे. यामुळे विहीर, तलाव, छोटे जलाशय तुडुंब भरले आहेत. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरी मार्गी लागला असले तरी, जगाचा पोशिंदा बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. कारण शेत लागवडीसाठी शेतात पेरलेल्या धान्याचे उत्तम राब तयार झाले आहे. मात्र, हे राब पाण्याच्या खाली गेले असल्यामुळे ते कुजून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
तालुक्यातच्या काही ठिकाणी लागवड पूर्ण झाली असली तरीसुद्धा या पावसामुळे भातलागवडीची कामे खोळंबली आहेत. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आता पावसाने थोडी विश्रांती घ्यावी, असे साकडे जणू बळीराजा वरुणराजाकडे घालत आहे. भाताची रोपे कुजली गेली तर केलेला खर्च आणि वेळ वाया जाईल; परंतु दुबार पेरणी करायची म्हणजे लागवडीचा काळ निघून गेल्याने हाती काहीच लागणार नाही, या चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहे.