| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान सारख्या लहान गावातील प्रश्न हे सोडविण्यासाठी तुम्हीच एकत्र बसले पाहिजे आणि त्यातून गावाची एकी निर्माण होते आणि प्रश्न लवकर सुटतात असा विश्वास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केला.माथेरान मध्ये वार्षिक परीक्षण साठी आलेले घार्गे यांची सर्व स्थानिकांनी भेट घेवून शहरातील प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, व्यापारी असोसिएशनचे नितीन शाह, राजेश चौधरी, माथेरान पतसंस्थेचे संचालक गिरीश पवार, अश्वपाल संघटनेच्या अध्यक्ष आशा कदम, श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष वर्षा शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकारी स्नेहा चव्हाण, प्राचार्य गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, आदीसह स्थानिक उपस्थित होते. यावेळी माथेरानच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार शहराच्या वतीने केला. घार्गे यांना प्रभारी पोलीस अधिकारी शेखर लव्हे यांनी यावेळी माहिती दिली.
माथेरानकरांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर हे अगदी लहान शहर आहे, त्या गावातील समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या लोकांना किंवा अधिकारी यांची गरज नाही. शहरातील घोड्यांचे दर ठरविणे, घोड्यांचे प्रश्न सोडवणे आदी सर्व जबाबदारी स्थानिकांनी आपल्यावर घेण्याची गरज आहे. ई-रिक्षा बाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी देखील स्थानिकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यासाठी माथेरानकर सक्षम आहेत, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मनोज खेडकर , प्रेरणा सावंत, स्नेहा चव्हाण, राजेश चौधरी यांनी यांनी शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा केली.