रोह्यातील शेडसई गावातील धक्कादायक प्रकार
शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील शेडसई गावात एमआयडीसी परिसरातून सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेततळ्यातील हजारो मासे मृत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
शेडसई येथील गट क्रमांक 58 मधील जमिनीवर प्रगतशील शेतकरी विलास सीताराम म्हात्रे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2011-12 मध्ये शेततळे तयार केले होते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी या तळ्यात मत्स्यपालन सुरू केले होते. चितळा, बोईट, कट्टा आणि इतर विविध जातींच्या माशांचे त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संगोपन केले होते. गेल्या काही वर्षांपासून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होता. मात्र, नुकत्याच आलेल्या भरतीच्या पाण्यासोबत एमआयडीसी परिसरातील रासायनिक केमिकलयुक्त सांडपाणी या भागात सोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे प्रदूषित पाणी थेट म्हात्रे यांच्या बंदिस्त शेततळ्यात शिरल्याने तळ्यातील असंख्य मासे तडफडून मृत झाले. मृत माशांचा दुर्गंध परिसरात पसरला असून, पर्यावरणीय धोक्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर विलास म्हात्रे यांनी महसूल व कृषी विभागाकडे धाव घेतली असून, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना लेखी निवेदन देत तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रदूषित पाणी सोडणाऱ्या संबंधित एमआयडीसी कंपनीचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून “उद्योगांच्या निष्काळजीपणामुळे शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरण धोक्यात आले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता संपूर्ण रोहा तालुक्यातून जोर धरू लागली आहे.





