| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सध्या राज्यात नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण हा मुद्दा चांगलाच तापला आहे. प्रकल्पग्रस्तांचे राष्ट्रीय नेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला न देण्यात मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटीलांचे नाव न दिल्यास अत्यंत आक्रमक व उग्र जन आंदोलन होईल, असा इशारा ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी दिला आहे.
प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचे तारणहार, लढवय्ये नेते, संघर्ष योध्ये, माजी खासदार स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, अशी जोरदार मागणी नवी मुंबई, ठाणे, मुंबईसह राज्यातील भूमिपुत्र करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून या नामकरणावरून राजकारण सुरू आहे. दि.बा.पाटील यांच्या नावाला स्थानिक भूमीपुत्रांनी पाठिंबा दिला असून राजकीय पक्षांनी देखील समर्थन दिले आहे. मात्र, अद्यापही कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने जनतेतून नाराजी व असंतोष व्यक्त होत आहे. पाच वेळा आमदार व दोन वेळा खासदार झालेले लोकनेते दि.बा.पाटील हे ओबीसींचे नेते आहेत. आणि आज ओबीसी आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. या पाश्वभूमीवर ओबीसी, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी, शूद्र यांच्यावर कायम अन्याय होत आलेला आहे. हाच अन्याय आज दि.बा.पाटील यांच्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे येथील वातावरण प्रचंड तापले असून पुन्हा फसवणूक होते का, अशी भावना जनतेत असून येत्या काळात हे आंदोलन अधिक आक्रमक व उग्र होईल, असा इशारा ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी दिला आहे. तसेच, दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात विलंब होत असून यामागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.





