अलिबागमध्ये संविधान दिनानिमित्त संविधान जागर यात्रा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय संविधान दिनानिमित्त शुक्रवारी येथील अलिबाग संविधान जागर समितीतर्फे अलिबाग शहरात संविधान जागर यात्रा काढण्यात आली. यावेळी संविधानाच्या विजयाच्या घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले. या संविधान जागर यात्रेमध्ये संविधान जागर यात्रा समितीचे समन्वयक अरविंद निंगळे, काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते दिलीप जोग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, समाजवादी पक्षाचे अलिबाग तालुका अध्यक्ष अशरफ घट्टे, पी.बी. आचार्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवव्रत पाटील, समाजक्रांती आघाडीचे किशोर पाटील, प्रल्हाद घेवदे, आरपीआयचे संजय जाधव, दादा खंडारे, फिरोज घट्टे, शुभांगी जोगळेकर, सुप्रिया जेधे, आदी विविध पक्षाचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व संविधान उद्देशिकेचे वाचन करुन या संविधान जागर यात्रेला सुरुवात करण्यात आली. अलिबाग शहरातून सदर जागर यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. याठिकाणी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.


मनोगत व्यक्त करताना सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत आपल्या संविधानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे फार महत्त्वाचे आहे. जी समता, सार्वभौमता, सामाजिक-आर्थिक न्याय, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व संकल्पना भारतीय संविधानात सामावलेल्या आहेत. या संकल्पना स्वातंत्र्यानंतर, आपण संविधान स्वीकारल्यानंतर लागू झाल्या. त्यावेळेसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की, भारतीय समाज हा विषम आहे. अनेक जाती जमातींमध्ये तो बांधलेला आहे. आज आपल्या देशात गरीबी आणि दारिद्य्राची समस्या आहे. देशाचा भूक निर्देशांक चिंताजनक आहे. जोपर्यंत ही विषमता संपत नाही तोपर्यंत खर्‍या अर्थाने भारतीय संविधानाची तत्व अमलात येणार नाहीत. जातीयवादाशी लढण्याची, धर्मनिरपेक्षता, श्रीमंत-गरीब दरी कमी करण्याची बाब असेल अशा सगळ्याच स्तरावर आपण मागे आहोत. देशातील उद्योगपतींची संपत्ती वाढत आहे तर गरीबांचे जगणे असुरक्षित झाले आहे. त्यामुळे अशी विषमता वाढत असताना संविधानाच्या घोषणा देऊन भागणार नाही. या विषमते विरुद्ध आवाज उठवला पाहिजे असेही महाजन यांनी सांगितले.
शेवटी समितीचे समन्वयक अरविंद निंगळे यांनी आभार मानून संविधान जागर यात्रेचा समारोप झाला.

Exit mobile version