। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अलिबागमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयात संविधान दिन मंगळवारी (दि.26) साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. यांनतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल देवांग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तसेच अलिबागमधील चेंढरे येथील समाजकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, कार्यालयीन अधीक्षक माधुरी पाटील, समाजकल्याण निरीक्षक अंकुश पोळ आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक संस्थेमार्फत त्रिसरण व पंचशील घेण्यात आले. यावेळी महामानवाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध संस्थामार्फतदेखील हा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती देण्यात आली.