साखळी उपोषण तात्पुरते स्थगित
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात यावेत यासाठी पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी 19 ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले होते. कर्जत तालुक्यात कार्यरत असलेल्या बांधकाम खात्याच्या चारही विभागाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
पोलीस मित्र संघटना कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते बांधकाम विभागाकडून खड्डेमुक्त करण्यासाठी आवाज उठवत होती. त्यांनी गेल्या महिनाभर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तरीसुद्धा कर्जत तालुक्यात कार्यरत असलेले सर्व बांधकाम विभाग पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन गंभीरपणे दखल घेत नव्हते. त्यामुळे रमेश कदम यांनी कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. आगामी गणेशोत्सवाच्या आधी तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती. साखळी उपोषणाची व्याप्ती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून त्यांनी रस्त्यांवरील खड्डे भरण्याची लेखी हमी दिली आहे. ते आपल्या मालकीच्या रस्त्यावरील खड्डे हे जेएसबी टाकून भरणार आहेत. तसेच, राज्य रस्ते विकास महामंडळ, कर्जत नगरपरिषद बांधकाम विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने निधी उपलब्ध झाल्यानंतर मालकीच्या रस्त्यावरील खड्डे भरले जातील, असे आश्वासन दिले आहे.






