| खोपोली | प्रतिनिधी |
पावसाळ्यात डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यासाठी विनियोग करण्याच्या उद्देशाने खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीने जलसंवर्धनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सरपंच महेश पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत आणि वनपरिक्षेत्र कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ढेबे बर्गेवाडी येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे या कामासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून योगदान दिल्याने लोकसहभागातून जलसंवर्धनाचा आदर्श निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. डोंगराळ भागातून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे, ही काळाची गरज बनली आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरपंच महेश पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वनविभागाच्या सहकार्याने वनराई बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. वनराई बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन त्याचा जमिनीत निचरा होण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील भूजलपातळी सुधारण्यास आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास हातभार लागू शकतो. यावेळी सरपंच महेश पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते अंकुश कदम, रघुनाथ ढेबे, संपत ढेबे, बाबू ढेबे, सचिन ढेबे, वनपाल रघुनाथ कोकाटे, संजयकुमार लोखंडे, वनरक्षक राणी पाटील, संतोषी बास्टेवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





