डोंगर फोडून फार्म हाऊसचे बांधकाम

महसूल विभागाकडून होतेय दुर्लक्ष

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील ठोंबरवाडी येथील डोंगर फार्म हाऊस बांधण्यासाठी फोडण्यात आला आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यामधून वाहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात येऊन साचले आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार याबाबत तक्रारी करण्यात आल्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात साचले असून, रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे कडाव सापेले राज्यमार्ग रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.

चिंचवली कडाव सापेले जांभिवली वेनगाव दहिवली असा राज्यमार्ग रस्ता आहे. याच रस्त्यावरील ठोंबरवाडी येथे मोठी टेकडी होती आणि त्या टेकडीला वळसा घालून राजानाला पाण्याचे कालवे हे या भागात पाण्याचे वितरण करतात. मात्र, ती टेकडी फार्म हाऊस बांधण्यासाठी फोडण्यात आली असून, मागील काही महिने टेकडी फोडून माती उत्खनन केले जात असताना कर्जत तहसील कार्यालय तसेच स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने टेकडी जमीनदोस्त होत आहे. त्याचा परिणाम तेथून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले आणि राजानाला कालवा हे दुथडी भरून वाहत आहेत. त्याचवेळी टेकडीमुळे वेगवेगळ्या भागात पाणी वाहून जायचे, मात्र टेकडी फोडल्याने ते सर्व पाणी सापेले गावाच्या बाजूला वळले आहे. त्यात सतत काही दिवस पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ठोंबरवाडी तसेच सापेले भागातील शेती पाण्याखाली गेली आहे.

दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयकडे तक्रारी केल्या होत्या.परंतु प्रशासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने आज तर प्रचंड पावसामुळे कर्जत तालुक्यातील भिवपुरी पॉवर हाऊसकडून येणारा रस्ता स्वामी समर्थ मठापासून ते सापेले गावापर्यंत पाण्याखाली गेला आहे. साधारण दीड किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली गेला असून, सापेले गावाच्या बाहेर असलेले फार्महाऊस आणि आरएमसी प्लांट पाण्याखाली गेले आहेत. रस्ता पाण्याखाली गेल्याने कडावपासून जांभीवली गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद पडली आहे.

Exit mobile version