किल्लांची बांधणी सुरू

| पाली । वार्ताहर ।
दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण! अवघ्या काही दिवसांवर आलेल्या सणासाठी खरेदी, फराळ बनविणे, किल्ले बनविण्याची लगबग सध्या सर्वत्र सुरू आहे. शहरांच्या तुलनेत गावांमध्ये आजही रेडिमेड किल्ल्यांऐवजी माती-दगड-विटांचे किल्ले बनविण्याला बच्चे कंपनीकडून प्राधान्य दिले जात आहे. काही ठिकाणी तरुण मंडळीही रायगड, प्रतापगड, शिवनेरी आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात दंग झाली आहेत. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने मातीचे मावळे व प्राणी, महाराजांच्या प्रतिकृती, सिंहासन आदी बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. रेडिमेड किल्ल्यांनाही पसंती मिळत आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा किमती 10 ते 20 टक्क्यांनी वधारल्या आहेत. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प होता. मूर्तींची विक्री निम्म्यापेक्षा अधिकने घटल्याने मोठे नुकसान झाले. यंदा मात्र विक्री चांगल्या प्रकारे होत असल्याचे पालीतील कारागीर नारायण बिरवाडकर यांनी सांगितले. मात्र परतीच्या पावसामुळे तयार मूर्ती खराब होण्याची व नुकसानीची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. किल्ला बनवायला आणि तो सजवायला खूप आवडतो, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, मावळे, प्राणी किल्ल्यावर मांडले की इतिहासाचे स्मरण होत असल्याचे पेणमधील पाचवीत शिकणार्‍या यज्ञा निरंजन सुर्वे हिने सांगितले
.
मातीचे किल्ले बनविण्याला पसंती
डोंगर, माळरान व शेतातून लाल किंवा काळी माती घमेल्यात किंवा पोत्यामध्ये टाकून आणायची आणि सर्व मित्र मंडळी मिळून किल्ला बनविण्याची मज्जा काही औरच आहे. हा आनंद गाव व खेड्यातील तर काही प्रमाणात शहरातील मुले घेतात. शिवरायांची प्रतिकृती, मावळे, सैनिक, प्राणी व रंगांनी किल्ला सजवायचा, त्यावर पाण्याचे कारंजे लावायचे. मोहरी टाकून गवत उगवायचे. रात्री किल्ल्यावर रोषणाई करायची, यासाठी मुलांची दिवाळीत धडपड सुरू असते.

विविध प्रकारच्या मूर्ती
किल्ला सजवण्यासाठी प्लास्टिकपेक्षा मातीच्या मूर्तींना मागणी आहे. बाजारात शिवाजी महाराज व मावळ्यांच्या विविध आकाराच्या, मुद्रांच्या आणि रंगांच्या मूर्ती उपलब्ध आहेत. याबरोबरच मातीच्या ढाल, तोफा, भाले, तलवार आदी युद्ध साहित्यही उपलब्ध आहेत. शिवाय विविध देवी-देवतांच्या प्रतिकृती, प्राणी (हत्ती, वाघ, बैल इत्यादी) सुद्धा विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

Exit mobile version