दिवाळीसाठी मातीचे मावळे व महाराजांच्या मूर्तींना पसंती
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
दिवाळी म्हणजे मौज, मजा आणि आनंदाचा सण आहे. डिजिटल व रेडिमेड च्या युगात देखील बच्चे कंपनी किल्ले बनविण्यासाठी उत्सुक दिसते. बहुसंख्य गावांमध्ये अजूनही मुले किल्ले बनविण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतवताना दिसतात. यावर्षी कोरोनाचे सावट सरले असून कोणतेच निर्बंध नसल्याने रेडिमेड किल्ले, मातीचे मावळे व प्राणी आणि महाराजांच्या मूर्ती बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. तसेच रेडिमेड किल्ले सुद्धा विक्रीला आले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किंमती 10 ते 20 टक्क्यांनी वधारल्या आहेत. पालीतील कारागीर नारायण बिरवाडकर यांनी सांगितले की कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. मूर्त्यांची विक्री निम्यापेक्षा अधिकने घटली होती. खूप नुकसान झाले होते. यंदा मात्र विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे समाधान आहे. पण परतीच्या पावसामुळे तयार मुर्त्या खराब होण्याची व नुकसानीची भीती आहे असे बिरवाडकर म्हणाले. पेण येथील पाचवीतील यज्ञा निरंजन सुर्वे या विद्यार्थिनीने सांगितले की शिवाजी महाराज, मावळे, विविध प्राणी यांच्या मुर्त्या किल्ल्यावर ठेवलेल्या बघायला खूप आवडते.
मातीचे किल्ले बनविण्याला पसंती
डोंगर, माळरान व शेतातून लाल किंवा काळी माती घमेल्यात किंवा पोत्यामध्ये टाकुन आणायची आणि सर्व मित्र मंडळी मिळून किल्ला बनविण्याची मज्जा काही औरच आहे. हा आनंद गाव व खेड्यातील तर काही प्रमाणात शहरातील मुले घेतात. किल्ल्याला मावळे, सैनिक, प्राणी व रंग यांनी सजवायचे. त्यावर पाण्याचे कारंजे लावायचे. मोहरी टाकुन गवत उगवायचे. रात्री किल्ल्यावर रोशनाई करायची अशा विधायक उपक्रम दिवाळीत अनेक गावातील मुले करतात. बच्चे कंपनीसह मोठे देखील यामध्ये सहभागी होतात.
विविध प्रकारच्या मुर्त्या
किल्ल्यावर ठेवण्यासाठी प्लास्टिक पेक्षा मातीच्या मूर्तींना मागणी आहे. बाजारात शिवाजी महाराज व मावळ्यांच्या विविध आकाराच्या व मुद्रांच्या आणि रंगांच्या मुर्त्या उपलब्ध आहेत. याबरोबरच मातीच्या ढाल, तोफा आदि युद्ध साहित्य देखील आहेत. शिवाय विविध देवीदेवता, प्राणी ( हत्ती, वाघ, बैल इत्यादी) सुद्धा मिळत आहेत.
किंमत
मध्यम आकाराची शिवाजी महाराजांची मातीची मूर्ती 120 ते 150 रुपयांना आहे. तर मातीचे मावळे, प्राणी 20 ते 30 रुपयांत उपलब्ध आहेत. ठिकठिकाणी यामध्ये थोडाफार फरक आहे.
रेडिमेड ची चलती
सध्या रेडिमेड किल्ल्यांची चलती आहे. शहरात, इमारती, वसाहती आदी ठिकाणी मग हे रेडीमेड किल्ले लावले जातात. आणि त्यावर मावळे व शिवाजी महाराजांची मुर्ती विराजमान केली जाते.
छत्रपती शिवाजी महाराज, मावळे व इतर मूर्तींना मागणी आहे. विक्री सुद्धा वाढली आहे. अनेकजण चांगला प्रतिसाद देत आहेत.
– ज्योती कुंभार, मूर्ती विक्रेत्या
दिवाळीत मातीचा किल्ला बनवायला खूप आवडते. किल्ला व त्यावर महाराजांची मूर्ती, मातीचे मावळे विराजमान झालेले खूप आवडतात. किल्ला बनवितांना खूप मज्जा येते.
– स्पंदन शिंदे, विद्यार्थी, पाली