| खोपोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणार्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते तथा खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियमन मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, संस्थेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि तालुक्यातील विविध पक्ष संघटना तसेच संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन आणि अद्यावत कार्यालयातून अधिकाधिक प्रभावीपणे कारभार होईल या आशयाच्या शुभेच्छा यावेळी उद्घाटक दत्तात्रेय मसुरकर यांनी दिल्या. अलिबाग को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विद्यमान अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनी देखील या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे, या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी योगदान दिलेल्या कंत्राटदार आणि कर्मचारी वर्गाचे यावेळी कौतुक करण्यात आले.