पाली बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम रखडले

ठेकेदाराला हवी वाढीव रक्कम
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील जीर्ण आणि जर्जर झालेल्या बस स्थानकाची इमारत जवळपास वर्षभरापूर्वी पाडण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व नूतनीकरणास अजूनही सुरुवात झालेली नाही. येथे जणूकाही खंडर झाले आहे. इमारत बांधणी व व स्थानकात नुतनीकरण कामांसाठी तब्बल 2 कोटी 36 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र ठेकेदाराला चालू वाढीव दर हवे असल्याने काम खोळंबले आहे.
स्थानकाची जुनी इमारत पाडली खरी मात्र जुन्या इमारतीचा राडारोडा येथे तसाच ठेवण्यात आलेला आहे. बाजूला तात्पुरता स्वरूपात प्रवाशी व कर्मचारी शेड बांधण्यात आली आहे. मात्र परिपूर्ण बस स्थानक इमारती अभावी प्रवासी व परिवहन कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षे धोकादायक स्थितीतल्या बस स्थानकाची इमारत तोडून त्याठिकाणी नवीन इमारत उभी रहावी यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून वारंवार राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी करण्यात येत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांकडून उपोषणे व आंदोलने देखील करण्यात आली.

उपोषणांतर रायगड परिवहन विभागीय नियंत्रक यांच्याकडून बस स्थानकाचे तात्काळ पुनर्बांधणीचे लेखी पत्र देण्यात आले होते. परंतु एक वर्ष उलटून गेले तरीही कोणत्याच कामाला सुरुवात झालेली नाही. पुढील महिन्यात पुन्हा आमरण उपोषणास बसणार आहे. बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होईपर्यंत उपोषण करणार आहे. – रवींद्रनाथ ओव्हाळ, आंदोलनकर्ते व रिपाई रायगड जिल्हा सचिव

ठेकेदाराने तात्पुरते बसस्थानक बांधून दिले. मात्र नंतर कोरोना काळात ठेकेदाराने नवीन बसस्थानकाचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे त्याच्या विरुद्ध आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. तसेच आता ठेकेदाराला चालू वाढीव दर हवे असल्याने काम सुरू झालेले नाही. भाववाढ मिळण्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवत आहोत. ठेकेदार काढल्यास नवीन टेंडर काढून दुसरा ठेकेदार निवडण्यात येईल. – विद्या भिलारकर, कार्यकारी अभियंता, परिवहन महामंडळ, मुंबई.

Exit mobile version