महादेव कोळी समाजाचा तिव्र विरोध
। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील रहाटाड येथे बांधण्यात येणारी प्राथमिक उपकेंद्रांची ईमारत ही नियोजित जागे ऐवजी इतरत्र जागेत बांधण्यात येत आहे. त्यामुळे येथील महादेव कोळी समाजातर्फे या इमारतीच्या बांधकामाला तीव्र विरोध होत आहे.
तालुक्यातील रहाटाड गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक उपकेंद्राच्या इमारतीसाठी 11 मे 2021 रोजी रहाटाड येथील गट नं. 250, क्षेत्र 0.52.0 हे आर. पैकी 0.05.0 हे आर. क्षेत्र मंजूर करण्यात आले होते. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून मंजूर करण्यात आलेल्या जागेत इमारतीचे बांधकाम सुरू न करता टेकडीवर जंगलाजवळील जागेत सुरू करण्यात आले आहे. ज्याचा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना फारसा उपयोग होणार नाही. त्याबाबत रहाटाड ग्रामपंचायतीच्या 26 सप्टेंबर रोजीच्या मासिक सभेत ठराव घेऊन हे बांधकाम थांबविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, पुन्हा मासिक सभेत या जागी बांधकाम करण्यासाठीची परवानगी देण्यात आल्याने महादेव कोळी समाजातर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, सद्यस्थितीत सुरू असलेले प्राथमिक उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे, यासाठी संबंधित अधिकार्यांकडे महादेव कोळी समाजातर्फे पत्र व्यवहार देखील करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्राथमिक उपकेंद्रांसाठी मंजूर असलेल्या जागीच इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी समाजाकडून करण्यात आली आहे.