महावितरणाचा अजब कारभार; एका महिन्यात दोन वीज बिल आल्याने ग्राहक संतप्त

। मुरूड । संतोष रांजणकर ।
मुरूड तालुक्यातील वीज ग्राहकांना सुरक्षा रक्कम भरण्याच्या नावाखाली दोन दोन वीज बिल आल्याने विज ग्राहकांना शाॅक बसला आहे. वीज ग्राहकांना या महिन्यात दोन वीज बिले महावितरणकडून दिली गेली आहेत. एक वीज बिल व दुसरा अतिरिक्त सुरक्षा रकमेच्या नावाने बिल आल्याचे पाहून ग्राहक हैराण झाला आहे. ही सुरक्षा रक्कम कसली असे विचारण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात ग्राहक गेले असता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही उत्तर देता आले नाही. त्यामुळे मुरुड मधील वीजग्राहक संतप्त झाला आहे.
दोन वर्षांच्या कोरोना काळात अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यात वाढती महागाईने ग्रासलेल्या ग्राहकांची महावितरण अतिरिक्त वीज बिल आकारत सुरक्षा रक्कमेच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करत आहे. यासंदर्भात ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना काहीच उत्तर देता आले नाही.
आधीच महावितरण नको-नको ते आकार आकारून वीज ग्राहकांना हैराण करून टाकत आहे. स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, वीज विक्रीकर, इतर आकार अशा सात प्रकारच्या आकाराच्या नावाखाली महावितरण भरमसाठ वीज बिल ग्राहकांच्या माथी मारत आहे. या महिन्यात अतिरिक्त सुरक्षा रकमेच्या नावाने वीज बिल देऊन वीज ग्राहकांना शाॅक देत आहे.
जर वीज बिल भरले नाहीत तर तुमचे वीज तोडण्यात येईल असे सांगण्यात येते. त्यामुळे वीज ग्राहक घाबरून वीज बिल भरत आहेत. कित्येक वीज ग्राहकांना त्यांचे मीटर बंद असल्याने सरासरी विज बिल ग्राहकांच्या माथी मारत आहे. मीटर बदलण्याची मागणी केली असता त्यांना नवीन मीटर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत आहेत. महावितरणच्या अशा गैर सुविधेमुळे वीज ग्राहक पुरता हैराण झाला आहे.

वारंवार येजा करावी लागते अधिकारी उपस्थित नसतात तसेच नवीन मीटर देखील उपलब्ध नाही आहेत अशा परिस्थितीत त डिपॉझिट घेतल जात आहेत , महावितरना मार्फत डिपॉझिट घेतले जात आहे पण जर एखाद्या चा मीटर बंद आहे म्हणून तक्रार केली असता बाहेरून ऑनलाईन विकत घेऊन लावावा लागतो किंवा एखादा चा मीटर बंद आहे आणि वापरात नाही असे कळवले ले असताना देखील ४४ – ५० रीडिंग चे बील दरमहा पाठवण्यात येत आहे आणि जर हे बिल भरण्यात आले नाही तर वीज कनेक्शन कपण्याची धमकी दिली जात आहे मग सर्व सामान्य माणसाला कळत नाही की आपली समस्या कुठे मांडवी आणि जर वीज कनेक्शन कापल तर आपल्या नावाची चर्चा होऊन बदनामी होईल ह्या भीती पोटी भरली जातात त्या मुळे महावितरणना जनतेची लूट करण्याचं काम सुरू च आहे. – वीज ग्राहक निकेतन सुर्ते.

आम्ही आधीच सुरक्षा रक्कम भरलेली असताना महावितरण वारंवार अशी सुरक्षा रकमेची मागणी का करत आहे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या आधी महावितरणने सुरक्षा रकमेवर कधीच व्याज दिलेले आठवत नाही. – वीज ग्राहक गणेश मिरजकर

वीज ग्राहकांच्या वापरानुसार दर महिन्याचे वार्षिक सरासरी अंदाजे बिल काढले जाते. ज्यांचे वीज वापराचे युनिट अधिक आहेत. अशा सरासरी वीज बिलावर अनामत रक्कम निश्चित केली जाते. त्यामुळे ही रक्कम नियमानुसार महावितरणाकडे सुरक्षित ठेवली जाते. त्यावर व्याजही दिले जाते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला त्याच्या वापरानुसार अनामत रक्कम भरणा करणे अनिवार्य आहे. – उपकार्यकारी अभियंता श्री महादेव दातीर

Exit mobile version