उरणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
। उरण । प्रतिनिधी ।
उरण शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी वाहने चालविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा गंभीर फटका नागाव येथील एका कुटुंबाला बसला आहे. अल्पवयीन वाहन चालकाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी नागाव-म्हातवली मुख्य मार्गावरील स्टार कॉम्प्लेक्स परिसरात एका अल्पवयीन मुलाने नॉन गियर स्कुटर चालवत प्रथम केगाव येथील प्रशांत दर्णे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर शाळेत लहान मुलाला घेऊन जाणाऱ्या नागाव काठेआळी येथील हर्षदा हेरंब म्हात्रे यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात हर्षदा म्हात्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. त्यांना तातडीने खारघर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली; मात्र उपचारादरम्यान प्रकृती खालावत गेल्याने सोमवारी (दि.22) त्यांचे निधन झाले. हर्षदा म्हात्रे या आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. त्यांच्या निधनामुळे नागाव परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित अल्पवयीन मुलाच्या पालकांवर तसेच वाहनमालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेनंतर उरण परिसरात अल्पवयीन वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा, क्लासेस परिसर, बाजारपेठा तसेच पीरवाडी समुद्रकिनाऱ्यासह अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली दुचाकी चालवताना दिसत आहेत. अनेक जण हेल्मेटशिवाय, ट्रिपल सीट आणि भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उरण पोलीस व वाहतूक विभागाने शाळा, महाविद्यालये, क्लासेस परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये विशेष मोहीम राबवून अल्पवयीन वाहन चालकांसह पालक व वाहनमालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एका निष्पाप महिलेचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल उरणकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







