ग्राहकांची अद्याप फटाके खरेदीकडे पाठ

व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण
। अलिबाग । सायली पाटील ।
दिवाळीचा सण आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या निर्बंधात मागील दोन वर्षे दिवाळी साधेपणाने साजरी केली. परंतु, यंदा फटाक्यांवरील बंदी हटविण्यात आल्याने बार फुटणार हे नक्की. परंतु, अद्याप ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरविल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षे सततच्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे अजूनतरी बाजारात शांततेचाच माहोल आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदाची दिवाळी साधेपणानेच; परंतु थोडी जल्लोषात साजरी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पण, असे असले तरीसुद्धा याचा मोठा फटका विक्रेत्यांना बसत आहे.
दरवर्षी दिवाळीची तयारी जवळपास 15-20 दिवस आधीच सुरू व्हायची. परंतु, कोरोनामुळे गेली दोन वर्षे या तयारीची लगबग हळूहळू कमी होताना दिसत आहे. तसेच सध्या लॉकडाऊनची टांगती तलवार या सणावर नसली तरीसुद्धा बाजारपेठांतील दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने दुकानदारांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतु, कोरोनापूर्वी असणारी फटाक्यांसाठीची मागणी तेवढी दिसून येत नसल्याने पूर्वीसारखा धंदा होण्याची शक्यता फार तुरळक वाटत आहे.
दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु, यंदा फटाक्यांमध्ये फारसे काही नाविण्य पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे सालाबादप्रमाणे फुलबाज्या, पाऊस, चक्र, टिकल्या, बंदुका, आपटी बॉम्ब, रॉकेट, मटका बॉम्ब, लॅनटर्न, सुतळी बॉम्ब, लवंगी, लक्ष्मी बार व या सगळ्या प्रकारांमध्ये लहान-मोठ्या आकारांचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साधारणपणे 100 रुपयांपासून दोन-तीन हजारांपर्यंत या फटाक्यांच्या किमती आहेत. परंतु, अजूनही हव्या त्या प्रमाणात ग्राहकांची ये-जा नसल्याने मालाचा खप फारसा झालेला नाही.
गेल्यावर्षी आणि यावर्षी धंद्याची परिस्थिती सारखीच असल्याचे, तसेच कोरोनामुळे सगळ्यांकडेच पैशांची कणकण भासत असल्याने आधीच ग्राहक नाहीत व त्यातही खरेदीसाठी येणारे ग्राहक सामानाचा भाव करून नेतात. परंतु, काहीच धंदा होत नसल्याने ग्राहक करत असलेल्या भावांसोबतच तडजोड करत असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

कोरोनामुळे सगळेच धंदे मंदावले आहेत. परंतु, आता लोकांची सगळीकडे वर्दळ सुरू झाली असल्याने ग्राहकांची पावले हळूहळू दुकानांकडे वळण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे यंदा जरा बरा धंदा होईल, असा अंदाज आहे.
रवीराज आंबेकर, फटाके विक्रेते, अलिबाग.

दोन-तीन दिवसांपूर्वीच दुकान मांडले असून, अजूनतरी ग्राहकांची तशी ये-जा सुरू झालेली नाही. यंदा फटाक्यांमध्ये फारसे नवे प्रकार आले नसून, हव्या त्या प्रमाणात ग्राहक नसल्याने फटाक्यांचा मालही कमी प्रमाणात आणला आहे. आणखी एक-दोन दिवसांनंतर ग्राहक दुकानात यायला सुरूवात होईल असे वाटते.
संदेश गोसावी, फटाके विक्रेते, अलिबाग.

Exit mobile version