| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा फटका येथील वीज ग्राहकांना बसत आहे. सबस्टेशनचे काम पूर्ण न झाल्याने अनेकदा वीज खंडित होते.
तालुक्यातील नेरे या ठिकाणी सब स्टेशनचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही या सबस्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. पनवेल तालुक्यातील नेरे येथे महावितरणच्या सबस्टेशनचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. मात्र, वीज गेल्यानंतर कित्येक तास विजेचा पत्ता नसतो. फॉल्ट शोधण्यातच बराचसा वेळ निघून जातो. पावसाळ्यात तर अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. ऑक्टोबर महिन्यात तर दिवसाआड वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा फटका येथील हजारो वीज ग्राहकांना बसतो. काही वेळेला रात्रभरदेखील वीज नसते. दोन दिवसांपूर्वी जवळपास सहा ते आठ तास वीज गायब होती. कनिष्ठ अभियंता कोकिटकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा त्यांचा भ्रमणध्वनी नॉटरीचेबल लागतो. त्यामुळे नागरिकांना वीज कधी येईल आणि विद्युत पुरवठा कुठे आणि कशामुळे खंडित झाला आहे, हे समजत नाही. त्यामुळे रात्रभर विद्युतपुरवठा कधी सुरळीत होईल याची वाट पाहण्याशिवाय वीज ग्राहकांकडे पर्याय नसतो. याबाबत कार्यकारी अभियंता जे.जे. माने यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच नेरे येथून स्विचिंग चालू करणार असून, काही दिवसातच सबस्टेशनचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.







