चालक जखमी; तीन दिवसांतील तिसरा अपघात
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, मंगळवारी (दि.29) सकाळी ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने सुरक्षा कठड्याला जोरदार धडक देत कठड्याच्या पलीकडे पलटी झाला. ही घटना बोरघाटात खोपोली एक्झिटजवळ घडली. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून, कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ येताच कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने समोरील सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनर कठड्याच्या पलीकडे जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या तीन दिवसांत सलग तीन अपघात झाले आहेत. या तीन अपघातांमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यामुळे बोरघाटातील अपघातांची वाढती मालिका पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे.
